माझ्याबद्दल

बदलत्या काळानुरूप बदलत्या गरजा ओळखून, शाश्वत विकासासाठी पाऊलं टाकणारं...
नमस्कार, मी शाम देशपांडे… लहानपणापासूनचे देशप्रेमाचे संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा ज्वलंत वारसा आणि विचारांचा वसा घेऊन मी राजकारणात आलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे लहानपणापासून हिंदुत्वाच्या विचारांशी जोडला गेलो, तो आजतागायत एकाच विचारांवर नितांत श्रद्धा ठेऊन माझी वाटचाल सुरू आहे. देशप्रेमाच्या भावनेतून ‘हैदराबाद मुक्ती संग्रामात’ सहभागी झालेल्या, आणि सरकारची पेन्शन नाकारणाऱ्या ‘स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर वामन देशपांडे’ ह्यांचे, अर्थातच माझ्या वडीलांचे ‘राष्ट्र प्रथम’ चे सखोल संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळेच ‘मी आजवर कधीच भ्रष्टाचार आणि गैरवर्तन केलेले नाही आणि ह्या पुढे देखील करणार नाही!’ असं छातीठोकपणे सांगू शकतो. कार्यकर्त्यांना जपण्याची आणि त्यांना माझ्याबरोबरच पुढे घेऊन जाण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली त्यामागेही हेच संस्कार आहेत.
कोथरुडकरांच्या आशीवादामुळे मला आणि माझ्या पत्नीला कोथरुड भागातून लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बदलत्या कोथरुडचा विकास करत असतानाच मी स्वतःलाही अपडेट आणि अपग्रेड करीत होतो. बी. कॉम. झाल्यानंतर नगरसेवक असताना स्वतःला अपडेट ठेवत ‘मास्टर ऑफ पर्सनल मॅनेटमेंट’ची पदवी प्राप्त केली. शिकत राहण्याची प्रक्रिया आजही निरंतर सुरू असून, आता मी पीएच. डी. मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. डॉक्टरेटच्या प्रबंधासाठी मी’ अस्तित्वातील कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी’ हा विषय निवडला आहे. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत, त्याचा अगदी सखोल अभ्यास करता येणं शक्य आहे, आणि त्यानुसार योग्य प्रकारे प्रगती करणे ही आजच्या काळाची गरज आहे. यावर माझा ठाम विश्वास आहे.
माझ्या संपूर्ण कारकिदीत, कुठलाही निर्णय घेताना, माझा दृष्टीकोन हा नेहमी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत कामाचा राहिला आहे. ह्या पूर्वी नगरसेवक म्हणून काम करताना रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आणि अन्य नागरी सुविधा योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवल्या. पण त्यात अडकून पडलो नाही. एक सामान्य नागरिक म्हणून, आपल्या प्रभागाचे नेतृत्व म्हणून, प्रत्येक विकास कामांना वेगळ्या टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न केला. प्रभागात विकासाची कामे करीत असताना त्यात लोकसहभाग वाढवला. ह्या संपूर्ण प्रवासात, कुठलाही निर्णय घेण्यापूवी, निर्णय राबवताना शाश्वत विकासावर माझा भर राहिला. एकच काम पुन्हा करावे लागू नयेत, अशा पद्धतीने विकासकामे केली.
नगरसेवक म्हणून कार्य करत असताना पुण्यात UTWT तंत्रज्ञान (Ultra-Thin White Topping) युक्त रस्ते असणारा संपूर्ण वॉर्ड प्रथम मी तयार केला. त्या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी केल्या नंतर मग पुण्यात सर्वत्र तसे रस्ते निर्माण होऊ लागले. डहाणूकर कॉलनीत तयार केलेल्या रस्त्याला गेल्या १७ वर्षांपासून हात लावावा लागलेला नाही, व खड्डेमुक्त रस्ते झालेत. शिवाय जागोजागी पाणी साचण्याच्या तक्रारीला वावच राहिलेला नाही.
विकास कामांसाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. मला असं वाटतं की सत्ता, पद कुठलंही असो नेतृत्वाने सर्वांचा विचार करून निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. सातत्याने वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत राहण्याचा माझा निर्धार आहे. फक्त विकासकामे करण्यावर भर देण्या पलीकडे, नागरिकांचे एकूण जीवनमान उंचावण्यावर भर देणं ही माझी दुसरी प्राथमिकता आहे. कोथरुडकरांच्या सांस्कृतिक क्षुधाशांतीसाठी गेल्या काही वर्षांपासून कोथरूड व्यासपीठातर्फे विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येत आहे.
आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता, मी सातत्याने नागरिकांसाठी योग आणि भारतीय प्राचीन व्यायाम प्रकारांकडे पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला आहे आणि ह्यापुढेही करणार आहे. मी सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिक आहे आणि तरीही अन्यायाविरूद्ध लढण्याची धमक माझ्यात आहे.
शांत प्रवृत्तीचा आणि समस्या सामोपचाराने सोडवण्यावर माझा भर असला, तरीही स्वातंत्र्य, संस्कृती आणि विचार ह्या मूलगामी विचारांवर घाला घातला गेला तर रस्त्यावर उतरून त्याचा प्रतिकार करायला मागेपुढे न पहाणारा लढवय्या म्हणजे शाम देशपांडे. मी जनतेचा एक सेवक आहे ह्याची आजही मला पूर्ण जाणीव आहे आणि ती कायम राहील. मी Vision कोथरूड ++ पुन्हा एकदा आपल्या समोर ठेवत आहे. आपल्या अपेक्षेप्रमाणे हा मतदारसंघ घडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या पुढेही राहीन ही ग्वाही तुम्हाला देतो.